नगर – महापालिका कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. तसेच कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी आघाऊ रक्कम देखील मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिवाळी सणापूर्वी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले.
मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान, थकीत रक्कम देणे ही कामगार संघटनेची मागणी होती. या संदर्भात महापौर शेंडगे यांनी आज दुपारी प्रशासन, कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक शाम नळकांडे, विजय पठारे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे, मुख्य लेखा अधिकारी धस, उपायुक्त श्रीनिवास कुरे,
आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, प्रभारी कामगार अधिकारीशेख अब्रार, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर,उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, कामगार संघटनेची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सानुग्रह अनुदान 20 हजार व थकीत देणे मिळावे अशी मागणी केली होती. मात्र मनपाची आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु युनियनची मागणी व प्रशासनाची भुमिका यामध्ये तोडगा महापौर व उपमहापौर यांनी काढला.