नगर, – नगर महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात व सावेडी उपनगरात महापालिकेच्या मालकीच्या जागांवर तीन ठिकाणी व्यापारी संकुले उभारण्यात येणार आहेत. त्या प्रस्तावांवर तातडीने काम सुरू करावे, अशा सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज प्रशासनाला दिल्या.
महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेत विभागवार अधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात प्राधान्याने उत्पन्न वाढीचा विचार करुन महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलनिर्मितीवर आज चर्चा करण्यात आली. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगररचना विभागप्रमुख राम चारठाणकर, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, संजय ढोणे, निखिल वारे, सतीश शिंदे आदींसह अन्य अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चितळे रस्त्यावरील पाडण्यात आलेले नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक व सावेडी भागातील एनसीसी कार्यालयाच्या जागेचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. नगररचना विभाग व बांधकाम विभाग यांना तसे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याशिवाय नगरमधील खासगी नवीन व दुरुस्ती बांधकामे परवान्यासाठी अडून राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही महापौर वाकळे यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी फायलींचा प्रवास कमीत कमी दिवसांत व्हायला हवा. प्रत्येक अधिकार्याने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. गंगा उद्यानाशेजारील रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले असून, प्रशासनाने ते तातडीने पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर वाकळे यांनी दिल्या.
शहराला लवकरच पूर्ण दाबाने पाणी..!
शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. बहुतेक अडथळे दूर झाले असून, लवकरच शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे यावेळी देण्यात आली. तसेच शहर सुधारित पाणीपुरवठा फेज-2 पाणी योजनेचे कामही प्रगतिपथावर असल्याची माहिती अधिकार्यांनी यावेळी दिली.