आबुधाबी – आबुधाबी टी-10 लीग स्पर्धेत आबुधाबी व नॉर्दन वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रोहन मुस्तफाने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना अंगातील टी-शर्ट काढल्यामुळे त्याला चेंडू अडवता आला नाही व हा चौकार गेला. त्यावर आपण स्वेटर काढत होतो त्यावेळी चुकून टी-शर्टही निघाला असा खुलासा आता मुस्तफाने केला आहे.
मुस्तफा क्षेत्ररक्षण करत असतानाच वॉरियर्सचा फलंदाज वासिम महंमद याने चेंडू मुस्तफाच्या दिशेने मारला. पण, त्याचवेळी मुस्तफा अंगावरील टी-शर्ट काढत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्याला चेंडू अडवता आला नाही व फलंदाजाला चौकार मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मुस्तफा चांगलाच ट्रोल झाला होता. अखेर त्यानेच याबाबत खुलासा केला आहे.
ही घटना ज्या षटकात घडली त्यानंचरचे षटक मला टाकायचे होते व करोनाच्या नियमांमुळे मैदानावरील पंच खेळाडूंची कोणतीही गोष्ट आपल्याकडे घेत नाहीत. त्यामुळे मी अंगातला स्वेटर काढत होतो, पण त्याचवेळी टी-शर्ट स्वेटरमध्ये अडकला. मुस्तफाने घडलेल्या प्रकारामुळे आपल्या आबुधाबी संघाची माफीही मागितली आहे.