पाथर्डी – तालुक्यातील मोहरी रोडवरील वीज चोरी करणाऱ्या एका खडी क्रेशरवर वसई , मुंबई , नाशिक अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणावरून आलेल्या महावितरण कंपनीच्या भरारी पथकांनी संयुक्त छापा टाकून कोट्यवधीची विज चोरी पकडली आहे.
वीज वितरण कंपनीच्या मीटर शेजारी थेट मीटर बंद करणारे स्वतंत्र उपकरण लावून संबंधित खडी क्रेशर चालकाने आतापर्यंत कोट्यवधीची वीज चोरी केल्याची बाब या कारवाईतून समोर आली आहे. गुरुवारी दिवसभर चाललेल्या या कारवाईत पथकांकडून संबंधित क्रेशर चालकाला नेमका किती दंड करण्यात आला,त्याचेवर कुठल्या कलमान्वये कारवाई करण्यात आली याची माहिती शुक्रवारी सायंकाळपर्यंत मिळू शकली नाही.
संबंधित खडी क्रेशर चालक अनेक वर्षांपासून मीटर बंद ठेवून चोरीच्या मार्गाने क्रेशरसाठी थेट वीज वापरत असल्याची माहिती भरारी पथकांना मिळाली होती. नियोजनबद्ध सापळा रचून तिन्ही ठिकाणाहून आलेल्या पथकाने संयुक्त कारवाई केली. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या कारवाईबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. तालुक्यात सर्वात मोठी वीज चोरी पकडल्याची ही घटना आहे. या कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील मोहरी व हंडळवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात खडी क्रेशरचा व्यवसाय सुरू आहेत. या ठिकाणी असलेल्या एका खडी क्रेशरवर चार अधिकृत वीज वितरण कंपनीचे व्यावसायिक विजेचे मीटर असून त्यामधील एका मीटरला डिवाइस बसून ते बंद करण्यात आले होते. अन्य तीन मीटरमध्येही हेराफेरी केल्याचा संशय वीज वितरणच्या अधिकाऱ्याला असल्याने ते तीन मीटर या भरारी पथकाने ताब्यात घेऊन त्याची पुढील तपासणीसाठी ते वीज प्रयोग शाळेत पाठवण्यात आले .
परिसरातील अन्य खडी क्रेशर चालकांच्या मीटरची तपासणी या पथकाने केली आहे. हे भरारी पथक अचानकपणे पाथर्डीत दाखल झाले. स्थानिक वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना या छापायची कोणतीही पूर्वकल्पना ही दिली गेली नव्हती. अतिशय गुप्तता या भरारी पथकाने बाळगून ही कारवाई केली आहे. वीज गळती होणारा तालुका म्हणून पाथर्डीचे नाव अग्रस्थानी आहे. वरिष्ठ पातळीवरून तालुक्यातील वीज गळती बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. ग्राहकांना वीज चोरीचा मार्ग दाखवणाऱ्या अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. भरारी पथकाचे अशा वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर व मार्ग दाखवणाऱ्या एजंटावर बारीक लक्ष आहे.