पुणे – रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात येत्या सोमवारी (दि. २२ जानेवारी) विराजमान होत आहेत. हा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी सोमवारीप्रभू श्रीराम महाआरती व अध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक शिवाजी माधवराव मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी ५ वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये या सोहळयाचे उद्धाटन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर उपस्थित असणार आहेत. यावेळी अॅड. मंदार जोशी, अमित जाधव, विजय आढाव, यश वालिया, ऍड. नितीन साबळे, अभिजीत देशपांडे, राज जैन, सुरज शर्मा आदी उपस्थित होते.
ढोल-ताशा वादना गायक हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते, जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर होतील. शंखनाद, धुपआरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीने हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर अयोध्येतील शरयूतीरी आरती करणारा समूह गंगाघाट आरती करणार आहे. मानकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा महाआरती सोहळा होत आहे.
फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या माध्यमातून मानकर यांनी आजवर सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. भक्तीमय वातावरणातील या सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असल्याचे अॅड. मंदार जोशी यांनी यावेळी सांगितले.