शिंगणापूर – सर्वपित्री अमावस्या व शनी अमावस्यानिमित्त आज शनी शिंगणापूरात लाखो भाविकांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. दिवसभर शनि अमावस्या असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यामुळे परिसर गर्दीने फुलला होता.
“सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय, पवनपुत्र हनुमान की जय’ च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. परिसरातील हॉटेल, पूजा साहित्याची दुकाने, स्टेशनरी दुकाने, खेळणीच्या दुकानामुळे रस्ते फुलले होते. शनी अमावस्यानिमित्त भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शासकीय व देवस्थान यंत्रणेची धावपळ दिसत होती.
शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे तसेच सोनई पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र थोरात व देवस्थानचे सुरक्षा रक्षक यांनी बंदोबस्त ठेवला. देवस्थान परिसरात दिल्ली, पंजाब व हरियाणा येथिल शनीभक्तांकडून भाविकासाठी भंडारा ठेवला होता. यावेळी राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सायंकाळच्या आरतीला उपस्थित होते.
पहाटेची आरती शनिभक्त माजी खा.चंद्रकांत खैरे व दुपारची आरती झिम्बावेचे उद्योगपती जयेश शहा व मुख्यआयकर विभागाचे आयुक्त कर्ना यांच्या हस्ते झाली. माजी आ. राहटल जगताप, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बदलापूरचे भाजपाचे आ.नारायण कुचे, युवा नेते उदयन गडाख, तहसिलदार डॉ.संजय बिरादार आदींसह धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह लाखो भाविकांनी दर्शन घेतले.