कोरेगाव – भोसे, ता. कोरेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन कोकणात गुरुवारी गेलेल्या एस. टी. बसचा म्हसळा येथे रात्री अपघात झाला. सुदैवाने विद्यार्थ्यांना अगोदरच मुक्कामासाठी स्थानिक शाळेत सोडले असल्याने एकजण ही जखमी झाले नाही. स्थानिक नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी बसचालकाला मद्यपान केल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतले आहे.
भोसे, ता. कोरेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराची बस क्र. एम. एच. 14-बी. टी. -4624 घेऊन चालक विशाल उंबरदंड हा गेला होता. भोसे येथून विद्यार्थ्यांची सहल सुरु झाली, कोकणात विविध पर्यटनस्थळी भेट दिल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजवर विद्यार्थ्यांना रात्री उशिरा मुक्कामासाठी सोडण्यात आले.
एस. टी. बस घेऊन चालक व शिक्षक हे जेवण करण्यासाठी बाहेर पडले. जेवण करुन परतल्यानंतर बस उभी करत असताना, चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि बस पिछाडीस असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातात बसच्या पाठीमागील बाजूच्या पत्रा आणि बंपरचे मोठे नुकसान झालेे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली, एस. टी. चालकाने मद्यपान केल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती देऊन पोलिसांना बोलावून घेतले आणि चालकाला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी श्रीवर्धन आगारामार्फत दुसरी बस आणि पर्यायी चालक सहलीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. सर्व विद्यार्थी हे सहलीच्या वेळापत्रकाप्रमाणे कोकणात पर्यटनस्थळाला भेट देऊन शनिवारी सकाळी भोसे येथे पोहोचणार आहेत.