संगमनेर -आम्ही जातो आमच्या गावा.., एक मराठा लाख मराठा वहीत लिहून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि 31) पहाटे घडली. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील सागर भाऊसाहेब वाळे (वय 25) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर वाळे हा तरूण झोळे येथून संगमनेरला कामासाठी येत असे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व जेवण करून झोपले होते. मंगळवारी पहाटे सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी एक वही सापडली असून त्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा.
आपला लाडका सागर मराठा असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, उपनिरीक्षक इस्माईल शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.