संगमनेर – शहरातील लखमीपूरा मशिदीच्या विश्वस्त मंडळाने अतिक्रमण करून त्यावर थाटलेली दुकाने हटविण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अतिक्रमण विरोधी पथकाला शिवीगाळ करीत “तुझे देख लूंगा, दुकान फिरसे यहीं लगाऊंगा” असे म्हणत धमक्या देत एजाज शेख उर्फ एजाज सुन्नी याने हातातील कागदांचा गठ्ठा मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावला. याप्रकरणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन रफिक शेख उर्फ रफिक सुन्तानी व सारिक शेख उर्फ सऱ्या अशा दोघांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह शिवीगाळ व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या परिसरातील नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून लखमीपुरा पंच ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मुस्ताक बेग व इतर भोगवटादारांनी ती जागा परस्पर शेख रफिक इजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी याला भाड्याने दिली. सुन्नी याने या जागेत ‘इंडिया पाटा’ नावाने दुकान थाटले. याबाबत परिसरातील फैज रहमतुल्ला व इतरांनी हे अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेत नगरपरिषदेने चार महिन्यांपासून लखमीपुरा पंच ट्रस्ट व संबंधित भोगवटादार रफिक सुन्नी यांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते.
मात्र, वेळोवेळी सांगूनही दोघांकडूनही कोणतीही कृती घडली नाही. संबंधितांना ५ डिसेंबर रोजी अंतिम नोटीस दिली होती. मात्र, त्या नोटीशीचीही दखल न घेतल्याने १२ डिसेंबरला शेख रफिक इजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी याला २४ तासात स्वखर्चाने अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली. त्यानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पथकाला माघारी पाठवले. मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी अतिक्रमण काढण्याऐवजी त्याने सदरील जागेला बॅरिकेटिंग केले. तेथे धार्मिक झेंडा फडकावून या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम सातपुते व सहाय्यक नगररचनाकार शुभम देसले यांनी अतिक्रमण धारकाला त्या जागेतील सामान काढून घेण्यासाठी आवश्यक वेळ दिला.
गुरुवारी दुपारी पालिकेच्या जेसीबीसह सदरील अतिक्रमणावर कारवाई सुरु केली. अचानक प्रक्षुब्ध झालेल्या रफिक शेख याने अचानक आपल्या हातातील कागदपत्रे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दिशेने भिरकावली, तो त्यांच्या अंगावर धावून गेला. हा प्रकार सुरु असतानाच दुसरा आरोपी सारिक शेख उर्फ सऱ्या याने पालिकेच्या जेसीबी चालकासह अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशिराने मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रफिक एजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी व सारीक एजाज शेख उर्फ सऱ्या या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व धमकी दिल्यावरुन भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली.
दोषींना अटक न केल्यास कामकाज बंद ठेवणार
अजूनही मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारे मुजोर मोकाट फिरत असल्याने विविध संघटनांकून आणि नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. . तसेच दोषींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा नागपालिकेचे सर्व कर्मचारी कार्यालयीन कामकाज बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करती, या आशयाचे निवेदन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.