राहाता- बिंगो नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राहाता शहरात विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे २३ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नसल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राहाता शहरात बिंगो नावाचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राहाता शहरातील मुख्य चौकातील छत्रपती कॉम्प्लेक्सचे तळमजल्यातील गाळ्यात सुरू असलेल्या जुगाराचे ठिकाणी धाड टाकून या सर्व ठिकाणाहून २३ आरोपी व बिंगो जुगार खेळण्यासाठी लागणारे एलसीडी टीव्ही स्क्रीन,सीपीयू, कीबोर्ड, माऊस व रोख रक्कम यासह सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्यात मात्र एकाही आरोपीला अटक केली नाही. याबाबत राहाता पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून सुमारे २३ आरोपी विरोधात मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे