निघोज – पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे गावात आरोग्याची सेवा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची तातडीने गरज असून बाभूळवाडे गाव व परिसरातील जनतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात यावे, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.
बाभूळवाडे गाव व परिसर मोठ्या लोकवस्तीचा आहे तसेच ठाकर वस्ती, आदिवासी वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बाभूळवाडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यानंतर याचा आरोग्याचा फायदा परिसरातील वाडी वस्तीवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, यासाठी या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे असून तातडीने आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार लंके यांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्याकडे केली आहे.
आमदार लंके यांनी बाभुळवाडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केल्याबद्दल बाभूळवाडे ग्रामस्थ व शिवतेज मंडळाचे संस्थापक ॲड. कृष्णाकांत जगदाळे, मंडळाचे अध्यक्ष दिलीप बोरुडे यांनी आमदार लंके यांचे आभार मानले आहेत.
आमदार नीलेश लंके यांचे आरोग्यविषयी सर्वाधिक योगदान आहे. कोरोना काळात नगर, पुणे जिल्ह्यातील हजारो करोना रुग्णांना पाठबळ देउन आरोग्याची सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. लंके यांची मागणी रास्त असून, लवकरच बाभुळवाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी दिली जाईल.