नगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. धाराशिव व बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर शहरामध्ये राजकीय नेत्यांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड फाडणे, काळे फासण्याचे आंदोलन सुरू आहे. सर्वत्र त्याचे पडसाद उमटत आहेत. त्याचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणा खबरदारीचे उपाय रात्ररतून राबविले आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने सोमवारी रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शहरातील राजकीय नेत्यांचे असलेले फ्लेक्स बोर्ड काढण्याची मोहीम राबून मोठ्या संख्येने हे बोर्ड काढले. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ नगर शहरातही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
रविवारी तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत असलेल्या अधिवेशनातही आंदोलकांनी गोंधळ घातला. संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महापालिका आयुक्तांशी केलेल्या चर्चेनंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत महापालिकेने शहरात लावलेले सर्व राजकीय नेत्यांचे फलक असलेले बोर्ड व इतर बोर्ड काढण्यास सुरुवात केली आहे.