राहुरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद आज पुन्हा उफाळून आला. सोमवारी अमावस्येनिमित्त तेथील कानिफनाथ मंदिरात सकाळी पूजा व धार्मिक विधी सुरू होता. यावेळी दोन गटात शाब्दिक वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण झाल्याने दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
राहुरी तालुक्यातील गुहा येथे गेल्या अनेक वर्षांपासून तेथील दर्गा व कानिफनाथ देवस्थानवरून दोन समाजात वाद सुरू आहेत. सदर वादाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. प्रशासनाने दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील, असा तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला. परंतु दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्या निमित्त कानिफनाथ देवस्थान येथे पूजा व धार्मिक विधी सुरू होता. त्यावेळी दोन समाजात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर दोन्ही समाजातील गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेत दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपअधीक्षक सवराज शिवपुजे व राहुरी येथील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाला पांगविण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, काही काळ गुहा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दोन्ही गटाने परस्पर विरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. गावात तणावपूर्ण वातावरणात शांतता आहे.
गुहा गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या वातावरण शांत आहे. कोणीही अफवा पसरवू नये किंवा नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन उपअधीक्षक शिवपुजे यांनी केले.