नगर – गेल्या अनेक दिवसापासून बांधकाम विभागंतर्गत कांदा मार्केट रस्ता, तसेच मनपांतर्गत येणाऱ्या अंबिकानगर ते पाच गोडावूनपर्यंतच्या रस्त्यांचे काम कार्यारंभाचे आदेश होऊन देखील केवळ शुभारंभच केले जात आहे. काम मात्र काही सुरू होत नसल्याने शिवसेनेच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करून दुपारनंतर उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मनपाचे अभियंता निंबाळकर व बांधकाम विभागाचे अभियंत्यांनी दिवाळीनंतर 16 तारखेला काम सुरू करण्यात येईल,असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते (शिंदे गट), शिवसेना युवानेते नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक विजय पठारे, नगरसेविका सुनीता कोतकर, युवासेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर, श्रीकांत चेमटे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रतीक बारसे, शिवाजी येवले, संग्राम शेळके, ओंकार सातपुते व नागरिक उपस्थित होते.
दिवाळीमुळे कामगार वर्ग उपलब्ध होत नसल्याने 16 तारखेपासून कामाला सुरूवात करण्यात येईल व त्यासाठी लागणारे साहित्य तत्काळ आजच्या आज या ठिकाणी टाकून देण्यात येईल, असे स्वतः उपस्थित राहून व लेखी आश्वासन देण्यात आले. आश्वासनानंतर उपोषण थांबविण्यात येत असल्याची माहिती दिलीप सातपुते दिली. ते म्हणाले की, जर 16 तारखेला काम सुरू झाले नाही, तर मग मात्र शिवसेना अधिक आक्रमक होऊन अधिकाऱ्यांना फिरणे देखील मुश्किल करील. शिवसेना स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व परिणामांची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल, असा इशारा त्यांनी दिला.