पुणे – भारतीय खाद्यसंस्कृती जगात भारी मानली जाते. त्यात सण-उत्सव किंवा लग्नसराईत गोड पदार्थांना मानाचे स्थान असते. यातील रसमलाई, काजूकतली या पदार्थांचा जगातील टॉप-50 गोड पदार्थांच्या यादीत समावेश झाला आहे. या दोन्ही पदार्थांना 5 पैकी 4.5 रेटिंग मिळाले आहे.
“टेस्ट ऍटलास’ या फूड अँड ट्रॅव्हल गाइड वेबसाइटने जगातील 50 लोकप्रिय गोड पदार्थांची यादी नुकतीच जाहीर केली. यात भारताच्या दोन पदार्थांचा समावेश करण्यात आलेला आहे. या यादीत पहिला क्रमांक तीन पदार्थांना विभागून देण्यात आला आहे. यात फ्रान्समधील “क्रेप्स’, ब्राझीलच्या बॉम्बोकाडो (नारळाच्या फ्लेवरची पेस्ट्री) आणि पेरू देशातील क्वेसो हेलाडो (आईस्क्रीमसारखा पदार्थ) यांचा समावेश आहे. या यादीमध्ये रसमलाई 31, तर काजू कतली 41व्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. विशेष म्हणजे, या यादीत टॉप टेनमध्ये एकट्या फ्रान्समधील तीन पदार्थांचा समावेश आहे.
काजू कतलीचा इतिहास
काजू कतलीचा शोध मुघल काळात लागला. जहांगीरच्या काळात पहिल्यांदा बनवला गेली, असे सांगितले जाते. शीख गुरूंचा सन्मान करण्यासाठी जहांगीरने काजू कतलीची ओळख करून दिली. शाही स्वयंपाकघरात काजू बर्फी घोटलेले दूध, काजू आणि बदामाची पूड यापासून काजूकतली तयार केली जायची.
रसमलाईचा शोध कसा लागला?
कोलकाता येथील प्रसिद्ध मिठाई निर्माते के.सी. दास यांचा मुलगा शारदा चरण यांनी प्रयोग म्हणून पहिल्यांदा रसमलाई बनवली. ते संशोधन सहायक होते. त्यांनी एका प्रयोगादरम्यान गोड दूध गरम करून त्यात रसगुल्ले भिजवले. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. या प्रयोगामुळे देशाला “रसमलाई’ पदार्थ मिळाला.
जगातील टॉप टेन गोड पदार्थ
- पदार्थ आणि देश
- क्रेप्स – फ्रान्स
- बॉम्बोकाडो – ब्राझील
- क्वेसो हेलाडो – पेरू
- तिरामिसू – इटली
- क्रेम ब्रूले – फ्रान्स
- डोन्ड्युर्मा – तुर्की
- अल्फजोर्स – अर्जेंटिना
- ड्युल्स-डे-लिची – अर्जेंटिना
- सोफ्युल ओ चॉकलेट – फ्रान्स
- सेरनिक – पोलंड