शिर्डी – शिर्डीतील तरुणांनी शहरातून गाढवाच्या गळ्याला सदावर्तेचे पोस्टर लावून धिंड काढली. राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवरील पुढाऱ्यांच्या पोस्टरला काळे फासून शिर्डी शहर संपूर्ण दिवस बंद ठेवून शासनाचा निषेध केला.
शुक्रवारपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणानंतर रविवारी कॅण्डल मार्च मोर्चा काढून सोमवारी शिर्डी शहर शंभर टक्के बंद ठेवून 7 मराठा समाजाच्या तरुणांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी सदावर्तेचे फोटो असलेले पोस्टर दोन गाढवांच्या गळ्यात बांधून शिर्डी शहरातून धिंड काढण्यात आली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी कोंबड्या आणून कोंबडी चोर अशा घोषणा करत युवकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
बसस्थानकात जाऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील नेत्यांच्या पोस्टरला काळे फासत “एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. सोमवारी सकाळपासूनच शिर्डी शहरातील साई संस्थान प्रसादालय व भक्ती निवास वगळता शहरात हॉटेल, लॉजिंग व विविध वस्तूंची दुकाने संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. राज्य शासन मराठा आरक्षण देण्यासाठी कुठलेही प्रकारचे निर्णय घेत नसल्याने शिर्डीत सोमवारपासून सचिन चौगुले, अनिल बोठे, रवींद्र गोंदकर ,नितीन कोते, प्रशांत राहणे, प्रकाश गोंदकर, कानिफ गुंजाळ या सात युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोमवारी सुरू झालेल्या या आमरण उपोषणास कमलाकर कोते, रमेश गोंदकर, हरिश्चंद्र कोते, ताराचंद कोते, यश कोते, विकास कोते, तानाजी कोते तसेच विविध समाज बांधवांनी या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.