अमोल मतकर
संगमनेर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. बोनस हाती पडताच कामगार खरेदीला पडल्याने बाजारात चार दिवसांपासून गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांवर असल्याने सोनेतारण ठेवून उत्सव साजरा करताना दिसून येत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणित करणारा सण म्हणजे दीपावली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सहकाराचे जाळे पसरल्याने दिवाळीच्या चार दिवस अगोदर सर्व शेतकऱ्यांचे बोनस मिळाल्याने बाजारात तेजी पाहायला मिळाली. तेव्हापासून खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपाळांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून, रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.
रेडिमेड फराळाला मागणी
गृहिणी, तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळत असल्यामुळे तयार फराळ विक्रीच्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी दिसत आहे. यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणाऱ्यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. जवळपास चार कोटींची उलाढाल ही खाद्यपदार्थांमध्ये होत असल्याचे चित्र आहे. पदार्थांच्या किमती गेल्या वर्षीइतक्याच आहेत. रेडिमेड फराळातून महिलांना उत्तम रोजगार मिळतो. या फराळाच्या निमित्ताने शेकडो महिलांना तीनशे रुपयांची रोजंदारी मिळते. मजुरांच्या कमतरतेने उत्पादकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.