पुणे – शहरात बांधकामे तसेच जुने बांधकाम पाडकामांच्या ठिकाणी हवेत उडणारे धोकादायक धूलीकणांचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्या अनुषंगाने कोणत्या विभागाने काय काम करावे, याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी काढला असला तरी हा आदेश केवळ “फार्स’ ठरला आहे.
महापालिका आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढल्यानंतर महापालिकेला सलग सहा दिवस दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे, अनेक विभाग प्रमुख तसेच क्षेत्रीय कार्यालयांना हे आदेशच पोहचलेले नसल्याने शहरात मागील दोन दिवसात कोणत्याही तपासणी अथवा पाहणी झालेली नाही. तसेच याबाबतचा एका ओळीचा अहवालही कोणी तयार केलेला नसल्याचे समोर आहे. त्यामुळे, प्रदूषण प्रतिबंधाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविण्यातच शासकीय यंत्रणा मशगूल असल्याचे वास्तव आहे.
काय आहे प्रकरण
देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी गाठली आहे. पुणे शहरही धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल तसेच मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धुलीकण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने महापालिकेकडूनही नियमावली जाहीर केली असून अंमलबजावणीची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय, पर्यावरण विभाग तसेच शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.
महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर 15 पथके नेमण्यात येणार आहेत. या पथकाकडून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण करून तपासणी केली जाणार आहे. या पथकात उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ट अभियंता तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचा एक जवान असणार आहे. या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची तपासणी करून त्याचा अहवाल दररोज सादर करायचा आहे. तर, पर्यावरण विभागाने पोलीस आणि आरटीओ कार्यालयाशी समन्वय ठेऊन या रोजच्या पाहणीचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करायचा आहे.
काय आहे वस्तुस्थिती
राज्य शासनाने महापालिकेस 7 नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रणासाठीची नियमावली पाठविली. त्यावर, कोणत्या विभागाने अंमलबजावणी करायाची यात एक दिवस घालविल्यानंतर, महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने 9 नोव्हेंबर रोजी महापालिका कार्यालयाची वेळ संपताना; या आदेशाच्या अमंलबजावणी कोणी व कशी करायची याचे आदेश काढले. त्यानंतर 10, 11 आणि 12 नोव्हेंबरला महापालिकेला सुट्टी आहे.
तर 13 नोव्हेंबर (सोमवारी) महापालिका सुरू असली तरी अनेक विभाग प्रमुखांनी या दिवशी रजा टाकलेली असून त्यानंतर लगेच 14 आणि 15 नोब्हेंबरला पुन्हा दोन दिवस दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे या आदेशावर प्रत्यक्षात 16 नोव्हेंबरपासून काम सुरू होणार आहे. त्यामुळे, प्रदूषण प्रतिबंधाचा आदेश सुटीच्या दिवसांत तरी हा कागदावरच राहणार आहे.