राहुरी – देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाल्याने रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. जुनाट इमारतीमुळे अनेक मर्यादा आल्याने व जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाची भर पडल्याने आरोग्य सेवाचे तीनतेरा वाजले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीने लक्ष वेधले असून, जुने कौलाचे बांधकाम असून, हे कौल पडू लागल्याने कधीही दुर्घटना घडू शकते. जीव मुठीत धरून रुग्ण व डॉक्टरांना राहावे लागत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला.
देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कधीही पडून जीवित हानी होऊ शकते. यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सरकारदरबारी अनेकवेळा प्रस्ताव पाठविले. खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. मात्र, प्रश्न मार्गी लागला नाही.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे जूने बांधकाम असलले कौले खाली पडू लागल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष साईनाथ बर्डे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या ठिकाणची दुर्दशा उजेडात आणून सरकारचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या वेळी कार्याध्यक्ष आबासाहेब कदम, शिवसेनेचे शहर संघटक अनिल चव्हाण, युवा सेनेचे शहराध्यक्ष मनीष देठे, वंचित युवा आघाडीचे शहराध्यक्ष अभिजित मुसमाडे, मयूर अडागळे, एकलव्य आघाडीचे गीताराम बर्डे, विठ्ठल सरोदे, सागर सरोदे, अभिजित वरघुडे, विकी पेटारे, गंगा सरोदे, श्याम सरोदे, संजय दुधे, रूपेश सरोदे, रवींद्र सरोदे, चंद्रकांत मकासरे, भारत कडू आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.-