नेवासा – नेवासा तालुक्यातील जैऊर हैबती, कुकाणा, अंतरवाली, पाथरवाला, सुकळी, भेंडा, धनगरवाडी, नांदूर शिकारी, सोनई, घोडेगाव परिसरात नंदीवाला समाज गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असून तालुक्यात हा समाज चार हजारांच्यापुढे आहे. या समाजाला मुलभूत सुविधा मिळण्यासाठी जैऊर हैबती येथील समाजाचे नेते बाळासाहेब फुलमाळी हे नेहमीच लढा देत आहेत.
भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या फुलमाळी यांनी समाजाची अर्थिक उन्नती करण्यासाठी आ.शंकरराव गडाख यांच्या नेत्तृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. नंदीवाला समाज आमदार गडाखांना भेटून आनंदी झाला आहे.
नंदीवाला समाजाकडे एक करमणूकीचे साधन म्हणून लोक बघत असताना या समाजाच्या प्रापांचिक अडचणी मोठ्या आहेत. या समाजाला साधा निवाराही नीटनेटका नाही. या समाजाची अर्थिक उन्नती, रोजगार, उद्योग, धंदा, नोकरी मिळण्यासाठी या समाजाला भक्कम राजकीय आधार मिळणे अपेक्षित आहे. राजकारणातील नेतेमंडळी केवळ निवडणूक जवळ आल्यावर या समाजाला आश्वासनाची खैरात देऊन वेळ निघून गेली की, समाज आहे त्या परिस्थितीतच सतत रहात आलेला आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आता नंदीवाला समाज आ.शंकरराव गडाख .पाटील यांच्या नेतृत्वाखानर काम करणार असल्याचे फुलमाळी यांनी सांगितले.