नगर -नगर तालुक्यातील जखणगाव येथे राज्यात प्रथमच सुरू असलेल्या जातनिहाय जनगणनेचा अहवाल 9 नोव्हेंबरला शासनाला सादर केला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, अशी विनंती जखणगावच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांना केली. त्यांनीही विनंती मान्य करत, प्रकृती सुधारल्यास नक्की मी तुमच्याबरोबर येईल, असे आश्वासन दिल्याचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी सांगितले.
जखणगावमध्ये जातनिहाय जनगणना सुरू आहे. याची सविस्तर माहिती जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यासाठी डॉ. गंधे यांनी शिष्टमंडळासह त्यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी आसाराम भिसे, अर्जुन सौदागर, योगेश सरपोतदार, संजय मगर, सुरज ताठे, अनिल मेहेर, जरांगे पाटलांचे सहायक रमेशजी तारक आदी उपस्थित होते. गंधे यांनी जरांगे यांना जातनिहाय जनगणना का करण्यात येत आहे, कशी केली जात आहे, कोण करत आहे, याची सविस्तर माहिती देऊन त्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
अहवाल मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना दिला जाणार आहे. यावेळी आपणही उपस्थित रहावे, असे आवाहन जरांगे यांना केले. त्यांनीही प्रतिसाद देत प्रकृती सुधारल्यास उपस्थित राहील, असे सांगितल्याची माहिती डॉ. गंधे यांनी दिली.