पारनेर – नगर-पुणे महामार्ग खड्डेमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले उपोषण चौथ्या दिवशी लेखी आश्वासन दिल्याने मागे घेण्यात आले. उपोषण सोडताना नोव्हेंबरअखेर सर्व मागण्या पूर्ण न केल्यास मनसे स्टाइलने पुढील आंदोलन करू, असे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटरप्राइजेसच्या व्यवस्थापनाला सुनावले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे व उपअभियंता भावसार यांनी तातडीने पाच मागण्या मंजूर करून कामास सुरुवात केली. उर्वरित चार मागण्या नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष डफळ, माजी सैनिक आरघडे मेजर, लहान मुलगा आयुष म्हस्के व भ्रष्टाचार जन आक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. मनसेचे पारनेर तालुका सचिव नारायण नरवडे, उपतालुकाध्यक्ष सतीश म्हस्के, सरपंच मनोज मुगसे, प्रताप शिंदे, शुभम शिंदे, अमोल वाबळे,पांडुरंग शेलार, नितीन पठारे, आरघडे मेजर, दत्ता पवार आदी उपस्थित होते.