नवी दिल्ली – संदेसरा बंधूंच्या बॅंक गैरव्यवहार प्रकरणी आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांची सक्तवसुली संचलनालयाकडून आज चौथ्यांदा चौकशी झाली. पटेल यांच्या निवासस्थानीच ही चौकशी करण्यात अली. यापूर्वी याच प्रकरणी 2 जुलै रोजी ईडीकडून पटेल यांची सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या यापूर्वीच्या तीन सत्रांमध्ये आपल्याला तब्बल 128 प्रश्न विचारले असे पटेल यांनी पत्रकारांना सांगितले होते.
आपण आणि आपल्या कुटुंबीयांविरोधात राजकीय सूड घेतला जात असून कोणाच्या दबावाखाली हे तपास अधिकारी काम करत आहेत, हे आपल्याला समजत नसल्याची प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती. यापूर्वी 27 जून, 30 जून आणि 2 जुलै रोजी मिळून एकूण 27 तास पटेल यांची चौकशी करण्यात आली आहे.
अहमद पटेल यांचे निवेदन प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत नोंदविले जात आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले