प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 28 -राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी स्थानकाबाहेर अवैध वाहतूकदारांचा सुळसुळाट झाला आहे. या वाहतूकदारांवर कारवाई करा, अशी मागणी खुद्द आगार प्रमुखांनी पोलीस व आरटीओकडे केली आहे. पण, प्रशासन त्यांच्या मागण्यांनाही केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे काही मार्गांवरील बसेससाठी प्रवासी शोधून आणण्याची वेळ एसटी अधिकाऱ्यांवर आली आहे.
शहरातील तिन्ही बसस्थानकांतून दररोज 60 ते 70 हजार जण प्रवास करतात. पण, या तीनही स्थानके अवैध वाहतुकीच्या विळख्यात अडकली आहेत. स्थानकाबाहेरच खासगी प्रवासी कार, ट्रॅव्हल्स बस लावून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यांचे एजंट बसस्थानक प्रवेशद्वाराजवळ थांबून कमी तिकीट घेण्याच्या आमिषाने प्रवाशांना घेऊन जातात. तर, काही एजंट थेट एसटी स्थानकात फिरून प्रवाशांना जाळ्यात ओढतात. त्यामुळे एसटी अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामासह प्रवासी खासगी वाहनातून जाणार नाहीत, यासाठी काम करावे लागत आहे.
प्रवाशांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी आम्ही विविध उपाय करत आहोत. स्थानकात सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. पण, एजंट त्यांना फसवून स्थानकात प्रवेश करतात. आम्हाला सीसीटीव्हीत एजंट आढळून आल्यास आम्ही त्यांना त्वरीत बाहेर काढतो. पण, यावर पोलीस आणि आरटीओने कारवाई करावी.
– शिवकन्या थोरात,
आगारप्रमुख, स्वारगेट
खासगी वाहतूकदारांचे एजंट स्थानक परिसरातून प्रवाशांना घेऊन जातात. प्रवाशांना कमी किंमतीत नेण्याचे आमिष दाखवले जाते. पण, प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून आम्ही पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलीस आणि आरटीओने बसस्थानक परिसरातील प्रवाशांची अवैध वाहतूक बंद केली पाहिजे.
– सुनील पाटील, आगारप्रमुख, पुणे स्टेशन
बसस्थानक परिसरात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या संदर्भात आम्ही पोलिसांना माहिती देत असतो. पण, यावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. लवकरच यावर योग्य ती कारवाई केली जावी.
– ज्ञानेश्वर रणावरे, वाहतूक व्यवस्थापक पुणे