प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 28 –पवित्र श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या भाविकांसीठी एसटी प्रशासनाने जादा 30 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावणात दर शनिवार, रविवार आणि सोमवारी या जादा बसेस धावणार आहेत.
करोनानंतर आता सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा श्रावणात भीमाशंकर येथे भाविकांची संख्या अधिक असण्याची अपेक्षा आहे. तसेच, येथे पर्यटकांची संख्याही अधिक असते. हे लक्षात घेता एसटी महमंडळाने वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथून दर तासाने या बसेस धावतील. यासाठीचे बुकिंग सुरू झाले आहे.
खासगी वाहनांना नो एंट्री
भीमाशंकर येथे अरुंद रस्ते आणि वाहनांची संख्या लक्षात घेता भीमाशंकरच्या सात कि.मी. आधी गावापर्यंतच खासगी वाहनांना प्रवेश मिळणार आहे. तेथे पार्किंग सुविधा असेल. तेथून पुढे एसटी प्रशासनाने मंदिरापर्यंत मिडी बसेसची व्यवस्था केली आहे. या मार्गावर शनिवार ते सोमवार 20 मिडी बस आणि मंगळवार ते शुक्रवार 10 मिडी बस धावतील.