हडपसर – समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बस उलटून झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यातून खासगी ट्रॅव्हल बसने प्रवास किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित होत असताना अशा बसेसवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईच होत नसल्याने शहर तसेच उपनगरांत अशा बसेसचे अनधिकृत आगार, थांबेच तयार झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता अशा ठिकाणीच खासगी ट्रॅव्हल बस सेवा व्यवस्थेवरच अंकुश ठेवणे गरजेचे आहे. परंतु, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे.
हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच खासगी ट्रॅव्हल्स बसने अनधिकृत थांबे तयार केल्याने या ठिकाणी रात्रं-दिवस वाहतूक कोंडी असते. रात्री आठ ते बारा-एक वाजेपर्यंत खासगी ट्रॅव्हल बसच्या अशा अनधिकृृत थांब्यांवर प्रचंड गदी असते. गाडीतळ येथे पुणे-सोलापूर महामार्गासह अंतर्गत डीपी रस्त्यावर बसेस थांबविल्या जात आहेत.
महामार्ग रस्त्याचा निम्मा भाग अशा बसेस वापरत आहेत. यातून वाहतूक कोंडी होत असताना यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. हडपसर येथील पुणे-सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातास निमंत्रण मिळत आहे. प्रवासी मिळवण्यासाठी येथे मोठी स्पर्धा असल्याने अपघातही होत आहेत. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकुन अपघातही झाले आहेत. खासगी ट्रॅव्हल बसेसचे अनधिकृत आगार, थांबे बंद करण्यात यावेत, या बसेसची नियमित तपासणी वाहतूक पोलिसांनी करणे गरजेचे ठरत आहे. मध्यंतरी कारवाईनंतर हा रस्ता मोकळा झाला होता. मात्र, पुन्हा या खासगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर येवून थांबत आहेत.त्यामुळे वाहन चालक, सोसायटी धारक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे
मगरपट्टा चौक व पुढे सावली कॉर्नर, आर्यन सेंटर, गाडीतळ पीएमपी बिल्डिंग, हॉटेल प्रणाम समोर, रविदर्शन, हडपसर आकाशवाणी आणि पंधरा नंबर चौकाच्या अलिकडे अशा परिस्थितीच मुख्य रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल चालकांनी बसचे थांबे केले आहेत. मात्र, त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने ही बाब गंभीर आहे. रात्री आठच्या सुमारास अशा बस येथे थांबत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत.
खासगी ट्रॅव्हसवर वेळोवेळी कारवाई केली जाते. ट्रॅव्हल्स येथे थांबवू नये, यासाठी नोटिस देण्यात आलेली आहे. वाहतुकीस पोलीस कर्मचारी थांबून या ट्रॅव्हल्स पुढे नेण्याच्या सूचना देत असतात. सणवारांना प्रवाशांची गर्दी पाहता कारवाईवर मर्यादा येतात. मात्र, लवकरच पुन्हा एकदा कडक कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव म्हणाले.