सासवड – पुरंदर तालुक्यातील यादववाडी येथे अफूची शेती करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. महेश काशिनाथ यादव (वय46)ग्रामपंचायत सदस्य सटलवाडी व भुजंग काशिनाथ यादव (वय 49) यांना अटक केली आहे. त्यांच्या शेतीमध्ये सासवड पोलिसांनी धाड टाकून 50 किलो वाजणाचा अंदाजे 1 लाख रुपये किंमतीच्या अफुची झाडे व बोंडे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 40 ते 50 किलोची बोंडे जप्त केली असून त्यापासून लाखो रूपयांची अफू तयार करण्याचा मानस असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रात्री 7च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
यादववाडी मध्ये शेतीत अफुचे उत्पन्न घेत असल्याची माहिती सासवड पोलिस स्टेशनला खबरी मार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिस अनिल खोमणे, गणेश पोटे, निलेश जाधव, सुभाष लाटणे, जब्बार सय्यद, सुरज नागरे, प्रतिक धिवार, विक्रम भोर, पोपट यादव, यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.