जालना – जालन्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कलिंगडची वाहूतक करणारा ट्रक उलटला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात ट्रकचालक जखमी झाला. मात्र त्याला मदत करण्याऐवजी लोकांनी कलिंगड नेण्यासाठी मोठी गर्दी केली. अंबड तालुक्याली डोमेगाव फाट्यावर ही घटना घडली. ट्रक उलटल्याने त्यातील कलिंगड रस्त्यावर विखुरले होते. महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कलिंगड लुटून नेले.
कलिंगडाचा ट्रक उलटल्याची ही बातमी काही क्षणाताच वाऱ्यासारखी पसरली आणि काही मिनिटांतच आजूबाजूच्या परिसरातील लोकांची तिथे एकच गर्दी झाली. मिळेल तितकी आणि जमेल तितकी कलिंगड घेऊन लोकं तिथून पसार झाली. काही जणांनी तर कलिंगड नेण्यासाठी मोठमोठ्या गोण्याही आणल्या होत्या. बघता बघता सर्व कलिंगड घेऊन लोकं गायब झाली.
जखमी अवस्थेतही ट्रक चालक लोकांना विनवणी करत होता, पण लोकांनी ना त्याला मदत केली ना त्याच्या विनवणीकडे लक्ष दिले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ट्रक चालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.