मुंबई – राज्यातील नियोजित वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता अन्य एका मोठ्या कंपनीने आपला तळ राज्याबाहेर हलवल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तपत्रामध्ये छापलेल्या नोटीसच्या आधारे “फोन-पे’ ( PhonePe ) ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झाल्याचे समजते. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे.
ही पोस्ट रोहित पवार यांनी “फोन-पे’ डेबिटेड फ्रॉम महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक’ या मथळ्याखाली यांनी शेअर केली आहे. रोहित यांनी एका चारोळीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. “वेदान्त’नंतर “फोन-पे’ची बारी गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्ताधारी’ अशी चारोळीही त्यांनी या नोटीसच्या फोटोसोबत पोस्ट केली आहे.
तसेच महाराष्ट्र सर्वाधिक कर देणारं राज्य असूनही येथील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचे सांगताना “टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे’ असे रोहित यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, “फोन-पे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, 2012 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.
तसेच, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-21 वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला 100 मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या 14 दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
आजच्या वर्तमानपत्रातील ही नोटीस आहे..
वेदांत/फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर..
काय चाललंय काय ?
महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ?
जाहिरातीत आक्षेप असल्यास नोंदवा असे जाहीर केले आहे
आक्षेप नोंदवा …. pic.twitter.com/QuYgmu8syT— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 22, 2022
दरम्यान, माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी देखील यासंदर्भात ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजच्या वर्तमानपत्रातील ही नोटीस आहे..
वेदांत/फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर.. असं म्हणत त्यांनी
काय चाललंय काय ? महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.