नाशिक – नाशिक जिल्हा रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घेणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांवरच पोलीस दलाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच ज्या रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आले, त्या ठिकाणातील लोक या रॅकेट मध्ये सहभागी असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली.
ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी कुटुंबीयांना गंभीर आजाराची कारणे दाखवली. या आजारासाठी जे वैद्यकीय प्रमाणपत्र बनवण्यात आले ते बनावट असल्याचा तपासात निष्पन्न झालेले असून या प्रमाणपत्रावर दोन उच्च पदस्थ डॉक्टरांच्या सह्या आहेत.
त्यानुसार तपासी पथकाला दिलेल्या अहवालानुसार सुरुवातीला दाखल सहा जणांना विरोधात गुन्हा दखल केल्यानंतर आता आणखीन या 21 कर्मचाऱ्यांची वाढ झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आणखी नावे पुढे येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वर्तविली आहे.
दरम्यान बोगस प्रमाणपत्र प्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक सारिका बाजीराव यांच्या पथक कसून चौकशी करीत आहे. सुरवातीला पथकाच्या तपासात पोलीस दलाचा लिपिक हीरा मनोज, लिफ्ट मॅन कांतीलाल गांगुर्डे यांच्यासह जिल्हा सिव्हील रुग्णालयातील उच्च पदस्थ डॉक्टर्स तसेच दोन खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची नावे ही या तपासात निष्पन्न झाल्याचे समोर आले आहे.