नवी दिल्ली – काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक बदल ट्विटर मध्ये केले असल्याचं दिसून आलं आहे. एलॉन मस्क यांनी काही दिवसांतच ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या अकाउंट्सबाबत एक महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानंतर ट्विटरवर ब्ल्यू टिक असेल तर ते अकाउंट वापरण्यासाठी तुम्हाला प्रतिमाह काही पैसे ट्विटरला द्यावे लागणार असं सांगण्यात आलं होत. तसेच वेगवेगळ्या अकाउंटसाठी ब्लू, गोल्डन, ग्रे रंगाची व्हेरिफाइड टिक देखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली.
दरम्यान, ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या या निर्णयानंतर आता मार्क झुकरबर्ग देखील आक्रम झाले असून त्यांनी देखील फेसबुक संदर्भात काही मोठे निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. नुकतंच मार्क झुकरबर्गने एक मोठी घोषणा केली असून, या घोषणेनंतर आता फेसबुक यूजर्सनाही धक्का बसला आहे. यापुढे आता ट्विटर प्रमाणेच तुम्हाला फेसबुकच्या ब्लू टीकसाठी सुद्धा पैसे मोजावे लागणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे.
सध्या या प्रीमियम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार असून, त्यानंतर अन्य देशातही ही सर्व्हिस होणार आहे. वेबसाठी त्याची किंमत 11.99 डॉलर्स आणि ioS साठी त्याची किंमत 14.99 डॉलर्स म्हणजेच, 1241 रुपये एवढी असणार आहे. दरम्यान, फेसबुकचा प्रीमियम प्लॅन हा ट्विटरपेक्षाही महागडा असल्याचे यातून दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जर आपल्या फेसबुकला ब्लू टिक हवी असेल तर ट्विटर परिमाणेच पैसे मोजावे लागणार आहेत.