तीन महिन्यांनंतर पालकमंत्र्यांना मिळाला वेळ

आज बैठक : शहरातील प्रलंबित प्रश्‍नांचा घेणार आढावा 

पिंपरी  – शहरातील राज्य शासनाकडे प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी तब्बल तीन महिन्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वेळ मिळाला आहे. विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर आल्याने शुक्रवारी प्रलंबित प्रश्‍न जाणून घेण्याचे सोपस्कार पूर्ण होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिका मुख्यालयात दुपारी दोन ते चार या वेळेत पालकमंत्री पाटील बैठक घेणार आहेत. आमदार, पदाधिकारी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अवैध बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प, आकृतीबंध, महापालिका हद्दीवरील पश्‍चिमेकडील गावे महापालिकेत समाविष्ट करुन घेणे, एच. ए. च्या ताब्यातील अतिरिक्‍त 59 एकर जमीन बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करणे, महसूल विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, पुुनावळे येथील राखीव घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठीची राखीव जागा, असे प्रलंबित प्रश्‍न आहेत.

माजी पालकमंत्री गिरीश बापट पुण्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे 7 जून 2019 रोजी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर 25 जुलै रोजी पालकमंत्र्यांनी भाजपच्या मोरवाडीतील कार्यालयाला धावती भेट दिली होती. त्यानंतर आठ दिवसात महापालिका मुख्यालयात येऊन प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु, त्यांनी आढावा घेतलाच नाही. दरम्यानच्या काळात त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाटील उद्या प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.