ठेकेदाराकडून साडेतीन कोटीचा दंड वसूल

कामातील दिरंगाई भोवली : तीन वर्षांत केवळ 50 टक्‍केच काम पूर्ण

पिंपरी – 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या कामाची निर्धारित मुदत संपूनही ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. या योजनेचे 2016 मध्ये सुरु झालेले काम 2018 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, मुदत संपून एक वर्ष झाल्यानंतरही 50 टक्केच काम पूर्ण केले. कामात दिरंगाई केल्याने महापालिकेने ठेकेदाराकडून आजपर्यंत तब्बल तीन कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

“जेएनएनयूआरअंतर्गत’ पहिल्या टप्प्यात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेसाठी केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकारचा 20 टक्के आणि महापालिकेचा स्वहिस्सा 30 टक्के आहे. या कामाची निविदा 217 कोटी रुपयांची होती. विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्‍टर या ठेकेदाराला 207 कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले होते. कामाची मुदत दोन वर्षांची होती.
|
कामाला सुरुवात 19 जून 2016 मध्ये झाली होती. त्यानुसार काम 18 जून 2018 ला काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, निर्धारित मुदतीत ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या ठेकेदाराला महापालिकेने दंड आकारणी सुरु केली होती. महापालिकेने दंडात्मतक कारवाई करत ठेकेदाराला 17 जून 2019 पर्यंत मुदतवाढ दिली होती. तथापि, या मुदतीत देखील ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नाही. केवळ 50 टक्केच काम पूर्ण झाले आहे. पालिकेने या ठेकेदाराकडून आजपर्यंत 3 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. बिलाच्या रकमेतून ही रक्कम वसूल केली जात आहे.

ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ

याबाबत बोलताना पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, शहरातील 40 टक्के भागात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम केले जात आहे. सन 2018 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ठेकेदाराकडून निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ठेकेदाराला महापालिकेने दंड वसूल केला आहे. ठेकेदाराने जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. परंतु, महापालिकेने 31 मार्च 2020 पर्यंत नऊ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.