पिंपरी – विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांच्या घर आणि कार्यालयासमोर समर्थकांनी घोषणाबाजी, फटाक्याची आतषबाजी आणि गुलाल-भंडाऱ्याची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
भोसरी विधानसभा मतदार संघात आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांना विजयाची खात्री होती. यामुळे कार्यालयाच्या शेजारी बुधवारपासूनच विजयाचे फलक लागले होते. पहिल्या फेरीपासूनच लांडगे आघाडी घेतल्याने साडेआठ वाजल्यापासूनच समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. लांडगे यांनी 50 हजारांची आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले.
लांडगे यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत फटाक्याची आतषबाजी करीत भंडाऱ्याची उधळण केली. त्यानंतर समर्थकांनी मतमोजणीच्या ठिकाणी बालेवाडीकडे धाव घेतली. बालेवाडीतून आल्यावर ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर लांडगे यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला. तर दुसरीकडे विलास लांडे यांच्या कार्यालयात शुकशुकाट होता.
चिंचवड विधानसभा मतदार संघात सुरवातीला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी व कार्यालयाजवळ तुरळक गर्दी होती. हळूहळू कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. फेरीगणिक वाढत जाणारे मताधिक्य कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सावातून दिसून येत होते. घोषणाबाजी केल्यावर कार्यकर्त्यांनी बालेवाडीकडे धाव घेतली. मतमोजणी केंद्रावरुन परतल्यानंतर जगताप यांनी मोरया गोसावीचे दर्शन घेतले.
त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसोबत परत पिंपरीतील भाजप कार्यालयात आले. तिथे त्यांनी राज्यातील भाजपच्या यशाबाबत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर जगताप पुन्हा पिंपळे गुरव येथे गेले. तिथे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. तर दुसरीकडे राहुल कलाटे यांच्या कार्यालयात सकाळी कार्यकर्त्यांची तुरळक गर्दी होती. मात्र जगताप हे आघाडी घेत असल्याचे समजल्यावर कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
पिंपरी विधानसभा मतदार संघात सुरुवातीला शिवसेनेचे ऍड. गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र त्यानंतर अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीत त्यांची आघाडी वाढत गेल्याने कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेत गुलाल उधळत परिसरात फेरफटका मारला. तर विविध ठिकाणी फटाके फोडून घोषणाबाजी केली. अण्णा बनसोडे याचे सायंकाळी चिंचवड स्टेशन येथे आगमन झाल्यावर ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतषबाजी केली. तर राष्ट्रवादीच्या पिंपरीतील कार्यालयासमोरही पेढे वाटत जल्लोष साजरा केला. तर ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता.