पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी संचालक म्हणून बारामतीचे रणजित तावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर पवार हे मागील 32 वर्षे प्रतिनिधित्व करीत होते.
उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप व राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी यामुळे अपुरा वेळ विचारात घेऊन जिल्हा बॅकेच्या संचालक पदाचा राजीनामा मागील महिन्यात दिला होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा व वि.का.सेवा. सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था “अ” वर्ग बारामती तालुका या मतदारसंघातील रिक्त असलेल्या संचालक निवडी संदर्भात बुधवारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यासभेत रणजित तावरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार रमेश थोरात व सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये तावरे यांचा सत्कार करण्यात आला.