दिल्लीतील शासकीय बंगला सोडण्याच्या नोटीसीनंतर प्रियंका गांधींच्या ‘मिशन 2022’ला वेग

नवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना काल दिल्ली येथील शासकीय बंगला खाली करण्याचे नोटीस बजावण्यात आले होते. या नोटिसीनंतर प्रियंका गांधी यांच्या उत्तर प्रदेशात राजकीय बेस कॅम्प उभारण्याच्या योजनेला वेग आल्याची माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून प्रियंका गांधी या वर्षाच्या सुरुवातीलाच लखनौ येथे वास्तव्यास जाणार होत्या. परंतु देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला व त्यांनी ही योजना पुढे ढकलली.

अशातच आता काल त्यांना शासकीय बंगला रिकामा करण्याची सूचना मिळाल्याने त्यांच्या उत्तर प्रदेश मोहिमेला चालना मिळाली आहे. काँग्रेस पक्षातील सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका गांधी या लखनौ येथे राजकीय बेस कॅम्प उभारणार आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा बंगला देखील निवडला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या लखनौ शिफ्ट होण्याबाबत ट्विट करताना काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी, “काँग्रेसच्या राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचा मार्ग उत्तर प्रदेशमार्गे आहे. प्रियंका गांधी यांच्या शिफ्ट होण्याचा थेट  अर्थ त्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असा आहे. यासाठीच प्रियंका प्रामुख्याने लखनौमध्ये स्थित असणं आवश्यक आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.