रेडा, दि. 2 (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात करोनाने थैमान घातले आहे. करोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत असून गुरुवारी (दि. 2) दिवसभरात तब्बल 13 जणांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
इंदापूर शहरातील एकाच कुटुंबातील 5, तालुक्यातील शेळगाव येथील 5 व जंक्शन परिसरातील 3 असे एकूण 13 रुग्णांची एकाच दिवसात भर पडली आहे. सध्या तालुक्याचे ठिकाण असणारे इंदापूर शहरात 14 रुग्ण उपचार घेत आहेत,तर बारामती येथे एक रुग्ण उपचार घेत आहे तसेच पुणे येथील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण उपचार घेतो आहे.
इंदापूर शहरातील एका 58 वर्षीय पुरुषाची आणि जंक्शन परिसरातील 35 वर्षीय महिलेची करोना चाचणी बुधवार (दि. 1) पॉझिटिव्ह आली होती. तर मंगळवारी (दि. 30) शेळगाव येथील एका 32 वर्षीय पुरुषाला लागण झाली होती. या सर्व रुग्णांच्या संपर्कातील तब्बल 37 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एकूण 13 जण पॉझिटिव्ह तर 24 जण निगेटिव्ह आले आहेत.