शिराळा – गुढे-पाचगणी ता. शिराळा येथील पठारावर चरीमध्ये अडकलेल्या गव्याने अखेरचा श्वास घेतला. सलग सहा दिवस व सहा रात्री प्रयत्न करूनदेखील एक बलाढ्य आणि सुंदर असा वन्यजीव प्राणी आपल्या हातून वाचला नाही याचे दुःख सर्वांच्या मनावर दाटून आले होते.
गुढे-पाचगणी ता. शिराळा येथील पठारावर चांदोली अभयारण्यामधून पाण्यासाठी व अन्नाच्या शोधात आलेला गवा एका मोबाइल केबलसाठी खोदलेल्या चरित अडकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसला. हा गवा जवळपास एक टन वजनाचा व 12 ते 15 वयोगटातील असावा असा अंदाज आहे. एका डोळ्याने आंधळा असलेला हा गवा रात्री रस्ता ओलांडत असताना खोदलेल्या चरीमध्ये अडकून पडला.
ग्रामस्थांनी वनविभाग व प्लॅनेट अर्थ फौंडेशनच्या रेस्क्यू टीमला याची कल्पना दिली. याची माहिती मिळताच बचाव पथक त्या ठिकाणी पोहोचले. गावकरी आणि डोजर, ट्रॅक्टरच्या मदतीने गव्याला शनिवार, दि. 16 नोव्हेंबरला सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु सहाव्या दिवशी शुक्रवार दि. 22 रोजी उपचारादरम्यान त्या गव्याने अखेरचा श्वास घेतला.
खोदलेल्या चरिमध्ये गवा स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नव्हता. त्यांने बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्या प्रयत्नात तो निष्क्रिय ठरला. ही अवस्था पाहता वनविभागाचे वन्यजीव डॉक्टर आणि आपत्कालीन बचाव दलाने कोल्हापूरच्या टीमला माहिती दिली. आणि ती टीम रात्री नऊ वाजता हजर झाली.
डॉ. सुभाष वाळवेकर, प्रदीप सुतार, आकाश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांनी जखमी गव्यावर प्रथम उपचार करायला सुरुवात केली. दुसरा दिवस उजाडला गवा बसूनच होता. बचाव पथकाने पुन्हा उपचार सुरू करून सलाईन लावण्यात आली. रात्री बारा वाजता त्यांनी पाण्याचा पहिला घोट घेतला.
100 लिटर सुमारे पाणी गावाने प्याला. हे पाहून सर्व टीमची व ग्रामस्थाची आशा वाढली. तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याने पुन्हा अन्न पाणी सोडल्याने चिंता वाढू लागली. प्रतिदिनी त्याची शक्ती कमी होऊ लागल्याने चिंतेत आणखीनच वाढ झाली. पाचव्या दिवशी तो पूर्णपणे अशक्त झाला होता. पाचव्या दिवशी पथकाने केलेल्या प्रयत्नातून त्याने पुन्हा पाणी प्यायला सुरुवात केली. पुन्हा सर्वांची आशा वाढली.
सहावा दिवस उजाडला बचाव पथक तीन दिवसापासून त्यांच्याजवळ ठिय्या मांडून बसले होते. उपचार पुन्हा सुरू झाले, परंतु 22 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता त्याने उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. वनविभागाचे कर्मचारी गावकरी डॉक्टरचे पथक जेसीबी, ट्रॅक्टर, चालक आणि इतर मदत करणाऱ्या संपूर्ण टीमला गव्याला वाचवण्यामध्ये अपयश आले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.
गव्याला वाचविण्यासाठी गोविंदराव चव्हाण, सुशांत काळे पाटील, वनरक्षक संजय मिरजकर, वनपाल जे. डी. शिंदे, बाबा गायकवाड, वनरक्षक प्रणव महाजन, अमित माने, अनिरुद्ध महाजन, गोरक्ष घेवदे, संतोष वालवेकर, प्रदीप सुतार यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले.परंतु शंकरने मध्येच जिवनाला पूर्णविराम दिला.