“ओडीएफ प्लस प्लस’ प्रस्तावावर खोटी सही केल्याचा सभेत आरोप
वाई – वाई नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत धूळफेक करून प्रशासनाच्या संगनमताने खोट्या सहीचा गुन्हा करणाऱ्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी हे कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी इतरांवर बिनबुडाचे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
नगरपालिकेच्या सभागृहात हे कृत्य पोळ यांच्याकडून झाले आहे. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्या पोळ यांच्या असभ्य कृत्याच्या विरोधात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाई पोलीस ठाण्यातही तक्रार अर्ज दाखल केला असून नगरविकास खात्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.
सावंत म्हणाले, नगराध्यक्ष डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांनी 19 नोव्हेंबर रोजी तीन विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्यासह चार महिला सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच ‘एसबीएम ओडीएफ प्लस प्लस डिक्लरेशन’ या प्रस्तावावर माझी खोटी सही केल्याचे लक्षात आले. माझ्या खोट्या सहीच्या आधारे शासनाची फसवणूक करण्याच्या प्रकाराबद्दल भर सभेत मी विचारणा केली होती.
माझ्या खोट्या सहीचा कागद मी त्यांना दाखवत असताना आमच्या दोघांच्या मध्ये नगराध्यक्ष बसल्या होत्या. मात्र, मी अंगावर धावून गेल्याचा पोळ यांनी केलेला आरोप हास्यास्पद आहे. सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यास सत्य बाहेर येईल. पदभार स्वीकारल्यापासून विद्या पोळ या पालिका कार्यालयात आठवड्यातून फक्त दोन दिवस हजर रहात होत्या. त्यामुळे त्यांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी. दीड-दोन वर्षांच्या कालावधीत बराचसा वेळ अँटीचेंबरमध्ये घालवणाऱ्या विद्यादेवी पोळ यांची उपस्थिती 35 ते 40 टक्के आणि शासनाचा पगार मात्र 100 टक्के घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाईचा विकास समोर ठेवून प्रशासनाच्या असंख्य चुका लोकप्रतिनिधींनी पोटात घातल्या. मुख्याधिकारी पदाधिकाऱ्याना विश्वासात घेऊन कामकाज करत नसतानाही दरवेळी आम्ही समन्वयाची भूमिका घेऊन पालिकेचा कारभार चालावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोळ यांच्या मनमानीमुळे प्रशासनाचा कारभार नेहमीच अडथळ्यांची शर्यत ठरला. त्यामुळे हिम्मत असेल तर मुख्याधिकाऱ्यांनी या सर्वांची शहनिशा समोरासमोर करावी, असे आव्हान अनिल सावंत यांनी दिले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. सभागृहात असा प्रकार झाला नसताना पोळ आपल्या पदाचा गैरवापर करून एका जबाबदार पदाधिकाऱ्यावर खोटे आरोप करत आहेत. अशा वेळी सर्व नगरसेवक व नागरिक अनिल सावंत यांच्या पाठीशी ठाम आहेत, असे नगरसेवक दीपक ओसवाल यांनी सांगितले.
पोळ यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय कामकाजाची जिल्हाधिकाऱ्यांनी विभागवार सखोल चौकशी करावी. त्यातून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे नगरसेवक महेंद्र धनवे म्हणाले.