मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी आज भाजपकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या पंकजा मुंडेंना या यादीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. याविषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी बोलताना, “केंद्रीय संघटनेने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी मान्य करायचा असतो. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांना खूप प्रयत्न केले होते. पण केंद्रीय संघटनेने त्यांच्याबाबत काही भविष्यातील विचार केला असेल. कार्यकर्त्यांची नाराजी क्षणभराची असते,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,”पंकजा मुंडे या मध्य प्रदेश भाजपाच्या सहप्रभारी आहे. मध्यप्रदेश हे मोठं राज्य आहे. त्यांच्यासाठी आणखी काही जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाच्या कल्पनेमध्ये असेल,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“विधानपरिषदेच्या १० जागासाठी भाजपाचे ५ उमेदार पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घोषित केले आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमच्या पक्षामध्ये आम्ही कोरी पाकिटे असतो त्यावर जो पत्ता लिहिला जातो तेथे आम्ही जातो. त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना घेते,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.