शहरात भाजपला मिळणार तिसरा आमदार
पिंपरी : भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच जणांची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने भाजपला शहरात तिसरा आमदार मिळणार आहे. यामुळे भाजपच्या गटात आनंदाचे वातावरण आहे.
उमा खापरे या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्यावर सध्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून जबाबदारी आहे. त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराबाबतही त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. त्या शहरातील भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत.
चिंचवड विधानसभेतून आमदार लक्ष्मण जगताप तर भोसरी विधानसभा क्षेत्रासाठी आमदार महेश लांडगे हे नेतृत्व करतात. आता भाजपला उमा खापरे याच्या रुपाने तिसरा आमदार मिळणार आहे. खापरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शहर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खापरे यांना उमेदवारी देऊन भाजपने एकप्रकारे महिलांना न्याय दिल्याची भावना महिला कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.