Sharad Pawar – अजित पवार यांनी 2 जुलै रोजी शिंदे -फडणवीस यांच्या सोबत हातमिळवणी करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. त्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्तारावरून प्रहारचे नेते बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा अनेकदा रंगल्याची दिसली.
अनेकदा कडू राज्य सरकारविरोधात वक्तव्ये करत असतात. अशात आज कडू यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. यावर कडू यांना विचारले असता त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
माध्यमांशी बोलतांना कडू म्हणाले,’एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबदल बघू’ असे महायुतीत राहण्याबद्दलचे सूतोवाच कडू यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या भेटीबाबत ते पुढे म्हणाले,’मदतीची जाणीव म्हणून शरद पवारांना आम्ही फोन केला आणि घरी येण्याच निमंत्रण दिले होते. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करू’ असे ते म्हणाले.
दरम्यान, बंद दाराआड चर्चेबाबत बच्चू कडू म्हणाले,’शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. पण जास्त शेतीवर चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते.’ असेही कडू म्हणाले.