पारगाव, (वार्ताहर)- माजी आमदार स्व. काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव आनंद काकासाहेब थोरात यांच्या सामाजिक कार्याची चुणूक पहावयास मिळाली. थोरात यांच्या अथक प्रयत्नातून सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात गाडगेवाडी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या धनगर समाजातील ढेबे परिवार आणि कचरे परिवाराची घरे उजळली आहेत.
आनंद थोरात हे समाज बांधवांना सर्व सुविधा सोयी मिळाव्यात म्हणून कायम धडपडत असतात. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात गाडगेवाडी ग्रामपंचायत डोंगराच्या पायथ्याला म्हणजे गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजातील ढेबे परिवार आणि कचरे परिवार रहात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
पण हा परिवार आजही अंधारात होते. लाईट त्यांच्याकडे जाणे शक्यच नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांमध्ये प्रत्येक ठिकाणी लाईट जायला पाहिजे, याच योजनेचा पाठपुरावा करून आनंद थोरात यांनी गाडगेवाडी ग्रामपंचायत येथील ढेबे परिवाराने कचरे परिवार यांच्या घरी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून लाईट जाण्यासाठी अथक प्रयत्न केले. महावितरणचे शाखा अभियंता रणजित चांदगुडे, सर्व सहकारी यांनी मेहनत घेतल्याने कचरे, ढेबे परिवार विजेने उजळून निघाले.
सामाजिक कार्यकर्ते आनंद थोरात आणि पापाजी मोहन या दोघांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारच्या अधिकाऱ्यांच्या पद्धतीने पाठपुरावा करून खंडाळा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटीची लाईट नेण्यात यश मिळाले. परिवारातील सर्व मंडळी आनंदाने नाचत आहेत.