सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत असून याचा प्रचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुतारी हे चिन्ह शौर्यचे व आनंदाचे प्रतीक आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचे तुतारी हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजे, असे प्रतिपादन आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील नगरपालिका चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तुतारी या चिन्हाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी सासवड शहरातून तुतारीची वाजत गाजत भैरवनाथ मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी इंगळे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार शिवाजी कोलते यांनी छापलेल्या तुतारी या चिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, विजय कोलते, पुष्कराज जाधव, बाळासाहेब भिंताडे, बंडूकाका जगताप, हेमंत माहुरकर, छाया यादव, बापू भोर, सुहास कांबळे, वामन कामठे, शिवाजी कोलते, हनुमंत पवार आरिफ आत्तार, नाना ताथोडकर, सोमनाथ खोमणे, नारायण निगडे, गोरख शेंडकर, शेखर पिसे आदी उपस्थित होते.