पारगाव, (वार्ताहर) – दौंड तालुक्यातील पारगाव येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या पारगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या वतीने माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त सभासदांना १५ टक्के लाभांश (३६ लाख ६३ हजार रुपये) वाटप करण्यात आला.
चार वर्षानंतर लाभांश मिळाला असल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संस्थेच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात पंढरीनाथ भाडळे, बाबूराव बोत्रे, वसंत ताकवणे, मोतिराम ताकवणे या सभासदांना लाभांश वाटप केला. संस्थेची सभासद संख्या २४२८ असून भाग भांडवल २ कोटी ५४ लाख रुपये तर चालूवर्षी ६६ लाख ६३ हजार नफा झाल्याची माहिती सचिव दत्तात्रेय शितोळे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम ताकवणे म्हणाले की, यावर्षी प्रत्येक सभासदाच्या भांडवलातून २५० रुपये अपघात विमा जमा करण्यात आला आहे. या विम्यामध्ये तरतूद म्हणून एखाद्या सभासदाचा अपघात झाल्यास औषधोपचारासाठी १ लाख रुपये व अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
लाभांश वाटपप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश शिंदे, सर्जेराव जेधे, माऊली ताकवणे, अरुण बोत्रे, श्यामराव ताकवणे, सोमनाथ ताकवणे, मच्छिंद्र ताकवणे, मधुकर ताकवणे, रमेश बोत्रे, रामदास ताकवणे, दत्तात्रेय शितोळे, दत्तात्रय निंबाळकर, नामदेव ताकवणे, सुभाष ताकवणे, महादेव कदम, मदन ताकवले, होमराज बोत्रे उपस्थित होते.