बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्राचे संपूर्ण लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आहे. भाजप ने तब्बल आठ वर्षानंतर महापालिकेवर निर्विवादपणे विजय मिळवला आहे.
भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्णपणे धुरळा उडवला आहे. या निवडणुकीत भाजपनं 35, काँग्रेसने 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे राऊतांनी बोलून दाखवलेले स्वप्न मात्र आता पूर्णपणे भंगले आहे.
या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. दरम्यान, बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव अशी आशा आम्ही करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर भाजपाने बेळगाव महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.