प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -तब्बल एक तप महापालिकेवर एकहाती वर्चस्व ठेवणारे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. दहा वर्षांनंतर कलमाडी या इमारतीत आले होते. ही भेट पुणे फेस्टिव्हलबाबत असली, तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कलमाडी सक्रीय होण्याची चर्चा आहे.
कलमाडी यांच्या पुढाकारातून दरवर्षी आंतराष्ट्रीय दर्जाचा पुणे फेस्टिव्हल आयोजित केला जातो. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या कार्यक्रमाचे हे 34 वे वर्ष आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे हा महोत्सव झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर कलमाडी यांनी आयुक्त कुमार यांची भेट घेऊन महापालिकेने या महोत्सवाला मदत करावी, अशी मागणी केल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
या भेटीवेळी कॉंग्रेसचे शहरातील जवळपास सर्वच आजी-माजी पदाधिकारी आणि प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांची मोट बांधून शहरात कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कलमाडी हातभार लावणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.