भारताचा अफगाणिस्तानवर निसटता विजय; मोहम्मद शमीची हॅटट्रिक!

इंग्लंड – विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगला होता. या सामन्याबाबत तगड्या भारतीय संघासमोर अफगाणिस्तानचा निभाव लागणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता मात्र विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने आज विजयासाठी भारताला चांगलेच तंगवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या बलाढ्य भारतीय संघाला अफगाणिस्तानने ८ गड्यांच्या मोबदल्यात २२४ धावांमध्ये गुंडाळले.

२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानी संघाने जिगरबाज खेळी करत भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर देखील सर्व गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावांपर्यंत मजल मारली. अत्यंत अटीतटीचा ठरलेल्या या सामन्यामध्ये भारतातर्फे मोहम्मद शमी याने अखेरच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी १६ धावांची गरज असताना उत्कृष्ट गोलंदाजी करत हॅटट्रिक नोंदवली. त्याने अखेरच्या षटकात मोहम्मद नबी, आलम आणि रहमान यांना एकापाठोपाठ तंबूचा रस्ता दाखवला. शमीच्या या भेदक माऱ्यामुळेच भारताला हा सामना आपल्या खिशात घालता आला.

Leave A Reply

Your email address will not be published.