हप्ता थकल्याचे सांगून ट्रक पळवला

पिंपरी – तुमच्या ट्रकचा हप्ता थकला आहे, तो फायनान्स कंपनीत नेऊन लावणार आहे, असे खोटे सांगून अज्ञात दोघा चोरट्यांनी स्प्रिंग लिफच्या लोखंडी पाट्याने भरलेला 16 लाख 67 हजार 426 रुपयांचा ट्रक पळवून नेला. ही घटना गुरुवारी (दि.20) दुपारी पावणेचारच्या सुमारास मोशीतील अथर्व हॉटेल ते कांदा मार्केट बोऱ्हाडेवाडी दरम्यान घडली.

याप्रकरणी चालक रामराजे संदीपान जगदाळे (वय 27, रा. बालघरे वस्ती, भैरवनाथ मंदिराजवळ, कुदळवाडी चिखली) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामराजे हे ट्रकचालक आहेत.

गुरुवारी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास ट्रक क्र (एम.एच 12 एफसी 1613) घेऊन मोशीकडून कांदामार्केट बोऱ्हाडेवाडीकडे निघाले होते. या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी ट्रक थांबवून आम्ही फायनान्स ऑफिसमधून आलो आहोत. तुमच्या गाडीचा हप्ता थकल्याने हा ट्रक आम्ही फायनान्स कंपनीत नेऊन लावतो, असे खोटे सांगून जबरदस्तीने चोरुन नेला. ट्रकमध्ये टाटा कंपनीचे 72 नग पाटे होते. पाटे आणि ट्रक असा एकूण 16 लाख 67 हजार 426 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. बी. बांबळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)