जाहिरात ही पासष्टावी कला समजली जाते. कित्येक वेळा वस्तूंची जाहिरात कशी करतो यावर त्यांचे बाजारातील आगमन व नंतर विक्रीतील वृद्धी अवलंबून असते. आजही आपण पाहतो की जाहिरातीचा परिणाम पटकन होतो. त्यामुळे बऱ्याचशा उत्पादनांची जाहिरात विविध माध्यमांतून केली जाते. वर्तमानपत्रे व त्यातून येणारी पत्रके, भिंतीवर लावलेली पत्रके, रेडिओ व दूरदर्शन या माध्यमांतून केली जाणारी जाहिरात अगदी आजच्या कॉम्प्युटरच्या युगातही विविध ऍप किंवा सेवांमधून केली जाणारी जाहिरात आपण पाहतो. एकूणच जाहिरातबाजीचं जग बनले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बरं जाहिरात या व्यवसायातही प्रचंड उलाढाल होत असते.
अनेक जाहिरात करून देणाऱ्याही कंपन्या आहेत. तुम्ही फक्त पैसे मोजले की तुमची वस्तू किंवा सेवा यांची हवी तशी हवी त्या प्रकारे हवे त्या ठिकाणी जाहिरात करून दिली जाते. कुणी सेलिब्रिटी वगैरे हवा असेल तरीही तो उभा केला जातो. आपल्याला काही प्रत्यक्ष तेथे जावे लागत नाही. मागे आमचे एमबीए मार्केटिंगचे प्राध्यापक सांगत होते की मार्केटिंगचे तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की तुम्हाला लोकांना वस्तू किंवा सेवा अगदी नको असली तरी त्यांना ती हवी असल्यासारखी पटवून देणे महत्त्वाचे असते. आमचे सर नेहमी म्हणायचे की तुम्ही जर एस्किमोला फ्रिज विकून दाखवला तर तुम्ही खरे मार्केटिंगचे दर्दी. मी खरोखर विचार करावयाचो की जेथे सतत उणे तापमान असते व स्वतः एस्किमो तर बर्फाच्या घरात राहतात त्यांना फ्रिज कसा काय विकायचा? आपणही विचार करा जरा. तर सांगायचा मुद्दा असा की मार्केटिंग व जाहिरात अशी झाली पाहिजे की समोरच्या व्यक्तीला एखादी वस्तू किंवा सेवा नको असेल तरीही त्यांनी ती घेतली पाहिजे. असे हे जाहिरातीचे युग आहे.
आपणही विचार करा की कधी आपण जेव्हा मॉलमध्ये जातो, एक-दोन वस्तू वा ठराविक वस्तू घ्यायच्या असतील तर त्यांच्याबरोबर अशा कित्येक वस्तू घेतल्या जातात ज्या त्यावेळी खरे तर आवश्यक नसतात. याचे मुख्य कारण आपण आत गेल्यावर पाहतो की काही विशिष्ट डिस्काउंट किंवा एकावर एक फ्री किंवा दोनवर एक फ्री किंवा अमक्यावर तमके फ्री नग, तमके नको असेल तरी ते अमक्यावर फ्री म्हणून घेतले जाते. कित्येक वेळा वस्तू हप्त्यावर घेण्याची सुविधा असते मग आताच पूर्ण पैसे टाकायचे नाहीत मग ती वस्तू तशी महाग पडत असेल तरीही घेतली जाते.
अलीकडे आपण पाहिले तर कित्येक जाहिरातीत विरोधाभास असतो.
पाहा, म्हणजे कित्येक वेळा धुण्याच्या किंवा साफसफाई करण्याच्या वस्तूंमध्ये खाण्याच्या वस्तू उदाहरणार्थ अमुक लिंबांची शक्ती अशा जाहिराती येतात. तसेच धोकादायक प्रमाणात कीटकनाशक असलेल्या वस्तूंना शीतपेय म्हणून आपण खात असतो हे प्रचंड अशा सततच्या जाहिरातींमुळेच.म्हणजे घातक वस्तू खाण्याच्या बनू लागल्या आहेत तर खाण्याच्या साफसफाईसाठी वापरण्यात येत आहेत ही सारी जाहिरातींची किमया आहे. शेवटी जाहिराती अशा गोष्टींच्याच होतात की ज्या वस्तूंचा खप आहे व तो वाढला जाण्याची शक्यता आहे. कपडे, दागदागिने, घड्याळे या वस्तू अगदी एसी दुकानांमध्ये दिसत आहेत. अगदी पादत्राणेही चपला, बूट काचेच्या शोकेसमध्ये एसीमध्ये दिव्यांच्या लखलखाटात विराजमान असतात. आणि तेही अव्वाच्या सव्वा भावाने. दुसरीकडे वाचलेली वा जुनी दुर्मिळ पुस्तके ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे ज्ञान भांडार असते ते पदपथावर कवडीमोल किमतीने मिळत असतात.
उत्तम पिंगळे